Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

2 इतिहास 8

शलमोनाची इतर कार्ये

शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले. शलोमोनाने त्याला हीरामकडून1 मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली. नंतर शलोमोन हमाथ-सोबाहकडे गेला आणि ते ताब्यात घेतले त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली. त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली, त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.

हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे. परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते. शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते.

शलोमोनाने फारोच्या मुलीला दावीदाच्या नगरातून तिच्यासाठी बांधलेल्या राजवाड्यात आणले कारण तो म्हणाला, “माझ्या पत्नीने इस्राएलचा राजा दावीदच्या राजवाड्यात राहू नये, कारण ज्या स्थानी याहवेहच्या कोशाचा प्रवेश झाला आहे, ते पवित्र आहे.”

याहवेहची जी वेदी त्याने द्वारमंडपासमोर बांधली होती, तिथे शलोमोनाने याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले, शब्बाथ, अमावस्या आणि वर्षातून तीन वेळा सण यासाठी मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे अर्पणे करण्यासाठी रोजच्या गरजेनुसार शलोमोनाने त्यावर याहवेहसाठी होमार्पणाचे बलिदान केले—बेखमीर भाकरीचा सण, आठवड्यांचा सण आणि मंडपांचा सण असे ते तीन सण. त्याचा पिता दावीदच्या आदेशानुसार, याजकांची जबाबदारी पार पाडण्यासाठी याजक, आराधनेत नेतृत्व करण्यासाठी व याजकांना दररोजच्या कामात मदत करण्यासाठी लेव्यांचे गट बनविले. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आदेशानुसार विभागून आलेल्या भागातून त्याने वेगवेगळ्या फाटकांसाठी द्वार रक्षकांचीसुद्धा नेमणूक केली. राजाने याजकांना किंवा लेवीय यांना दिलेल्या कोणत्याही आज्ञेपासून तसेच भंडाराच्या अंतर्भूत विषयामधील आज्ञेपासून ते विचलित झाले नाहीत.

ज्या दिवसापासून याहवेहच्या मंदिराची पायाभरणी केली गेली, त्या दिवसापासून ते होईपर्यंत शलोमोनचे सर्व कार्य पूर्ण झाले. याहवेहचे मंदिरही पूर्ण झाले.

नंतर शलोमोन एदोम या बंदरावर असलेल्या एजिओन-गेबेर आणि एलोथ येथे गेला. आणि हीरामाने त्याला आपल्या माणसांबरोबर म्हणजेच त्याच्या अनुभवी खलाश्यांनी चालविलेली जहाजे पाठविली. त्यांनी शलोमोनच्या माणसांबरोबर ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे पन्नास तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.2

Source notes (2)
  1. Footnote किंवा हुराम
  2. Footnote अंदाजे 15 मेट्रिक टन

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.