Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
2 इतिहास 3
शलोमोन मंदिर बांधतो
मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती. शलोमोन राजाने आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी बांधकामास सुरुवात केली.
परमेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी शलोमोनाने पाया घातला, त्याची लांबी साठ हात आणि रुंदी वीस हात1 होती. मंदिरापुढील द्वारमंडपाची लांबी मंदिराच्या रुंदीएवढीच म्हणजेच वीस हात व उंचीही वीस हात होती.
त्याच्या आतील भाग शुद्ध सोन्याने मढविलेला होता. मंदिराचा दिवाणखाना त्याने देवदारू लाकडाची तक्तपोशी करून ती सोन्याने मढविली व तिच्यावर खजुरीचे वृक्ष व साखळ्यांची नक्षीचे कोरीव काम केले होते. मंदिर मोलवान रत्नांनी सजविले होते. परवाईम नामक ठिकाणी मिळणारे सोने वापरण्यात आले होते. त्याने मंदिराच्या छताचे वासे, दारांच्या चौकटी, भिंती आणि मंदिराचे दरवाजे सोन्याने मढविले, भिंतींवर करुबाची आकृती कोरली.
त्याने परमपवित्रस्थान बांधले, त्याची लांबी मंदिराच्या रुंदीएवढी, वीस हात लांब आणि वीस हात रुंद होती. त्याच्या आतील भाग सहाशे तालांत2 शुद्ध सोन्याने मढविला. त्यात पन्नास शेकेल3 वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.
मग मंदिराच्या परमपवित्रस्थानात शलोमोनाने दोन कोरलेले करूब बसविले व त्यांनाही सोन्याने मढविले. करुबांच्या पंखांची एकूण लांबी वीस हात होती. पहिल्या करुबाचा एक पंख पाच हात लांब होता आणि तो मंदिराच्या भिंतीला लागून होता, तर त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात4 लांब असून दुसऱ्या करुबाच्या पंखाला लागून होता. त्याचप्रमाणे दुसऱ्या करुबांचा एक पंख पाच हात लांब आणि मंदिराच्या दुसऱ्या भिंतीला लागून होता आणि त्याचा दुसरा पंख सुद्धा पाच हात लांब आणि पहिल्या करुबाच्या पंखाला लागून होता. या करुबांचे पंख वीस हात पसरलेले होते. मुख्य दिवानखाण्याकडे5 तोंड करून ते त्यांच्या पायांवर उभे होते.
त्याने करुबांच्या आकाराची कशिदा केलेले निळ्या, जांभळ्या व किरमिजी धाग्यांचे आणि तागाच्या कापडाचे पडदे तयार केले.
मंदिराच्या समोरील भागासाठी त्याने दोन आधारस्तंभ तयार केले जे एकत्र मिळून पस्तीस हात6 लांब होते, प्रत्येक स्तंभावर पाच हात उंचीचा कळस होता. त्याने एकमेकात गुंफून विणलेल्या साखळ्या बनविल्या आणि त्या आधारस्तंभाच्या टोकांवर ठेवल्या. त्याने शंभर डाळिंबेसुद्धा तयार केली आणि त्यांना साखळ्यांना लागून जोडले. त्याने मंदिराच्या समोर आधारस्तंभ बांधले, एक दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे असे ते उभारले. दक्षिणेकडील खांबाला त्याने याखीन7 असे नाव दिले आणि उत्तरेकडील खांबाला बवाज8 असे नाव दिले.
Source notes (8)
- Footnote अंदाजे 27 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद
- Footnote अंदाजे 21 मेट्रिक टन
- Footnote अंदाजे 575 ग्रॅ.
- Footnote अंदाजे 2.3 मीटर
- Footnote किंवा आतील बाजूस
- Footnote अंदाजे 16 मीटर
- Footnote याखीन अंदाजे अर्थ तो स्थापित करतो
- Footnote बवाज अंदाजे अर्थ त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.