Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

2 इतिहास 13

यहूदीयाचा राजा अबीयाह

इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला. त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह1 होते. ती गिबियाह येथील उरीएल याची कन्या होती.

अबीयाह व यरोबोअम यांच्यामध्ये युद्ध झाले. अबीयाहने चार लाख सक्षम योद्धे घेतले, यरोबोअम आठ लाख संख्या असलेले सक्षम सैन्य घेऊन त्याच्या विरोधात युद्धरेषेवर जाऊन थांबला.

अबीयाह एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील सेमाराईम पर्वतावर उभा राहिला आणि म्हणाला, “यरोबोअम आणि सर्व इस्राएल लोकांनो, माझे ऐका! तुम्हाला माहीत नाही काय की, इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांनी मिठाच्या कराराद्वारे2 इस्राएलचे राज्यपद दावीद आणि त्याच्या वंशजांना कायमचे दिले आहे? तरीसुद्धा दावीदाचा पुत्र शलोमोनचा अधिकारी, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने त्याच्या धन्याच्या विरोधात बंड केले. कुचकामी गुंडांची टोळी त्याच्या सभोवती गोळा झाली व त्यांनी शलोमोनचा पुत्र रेहोबोअमचा विरोध केला, जो तेव्हा बालक असून व निर्णयक्षमता नसलेला होता व त्यांचा सामना करण्यास असमर्थ होता.

“आणि आता तुम्ही याहवेहच्या राज्याला, जे दावीदाच्या वंशजांच्या हातात आहे, विरोध करण्याची योजना केली आहे. तुमचे खरोखरच प्रचंड सैन्य आहे आणि तुमच्याकडे यरोबोअमने तुमची दैवते केलेली सोन्याची वासरे आहेत. तुम्ही याहवेहचे याजक अहरोनाचे पुत्र आणि लेवी यांना हाकलून दिले आणि स्वतःचे याजक तयार केले, जसे इतर देशातील लोक करत नाहीत का? जो कोणी एक तरुण बैल आणि सात मेंढे घेऊन स्वतःला पवित्र करण्यासाठी येतो, तो जी दैवते नाहीत अशांचा पुजारी होऊ शकतो.

“आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे. परमेश्वर आम्हाबरोबर आहेत; ते आमचे नेतृत्व करतात. त्यांचे याजक तुझ्याविरुद्ध युद्धाचे रणशिंग वाजवितील. इस्राएलच्या लोकांनो, तुमच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेह, यांच्याविरुद्ध लढाई करू नका, कारण तुम्ही यशस्वी होणार नाही.”

यरोबोअमने पाठीमागील सर्व बाजूंनी सैन्य पाठवले होते, म्हणजे तो यहूदीयाच्या पुढे असताना, ते त्यांच्यामागे दबा धरून बसले होते. यहूदीयांनी सभोवार पाहिले, तेव्हा आपण मागे व पुढे वेढले गेलो आहोत असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी मदतीकरिता याहवेहचा धावा केला आणि याजक रणशिंग वाजवू लागले. जेव्हा यहूदी लोकांनी रणगर्जना केली, तेव्हा परमेश्वराने यरोबोअम आणि संपूर्ण इस्राएली सैन्याचा अबीयाह आणि यहूदीयासमोर नायनाट केला. इस्राएली लोक यहूदीयांसमोरून पळून गेले आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या हाती दिले. अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले. त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते.

अबीयाहने यरोबोअम याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून बेथेल, यशनाह आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आजूबाजूची गावे घेतली. इस्राएलचा राजा यरोबोअम अबीयाहच्या हयातीत परत सत्ता मिळवू शकला नाही. शेवटी याहवेहने त्याला ताडण केले आणि तो मरण पावला.

इकडे यहूदीयाचा राजा अबीयाह फारच बलशाली झाला. त्याला चौदा पत्नी, बावीस पुत्र व सोळा कन्या होत्या.

अबीयाह याच्या शासनकाळातील इतर घटना, त्याने काय केले आणि तो काय म्हणाला, हे सर्व इद्दो संदेष्ट्याने लिहिलेल्या इतिहासात नमूद केलेले आहे.

Source notes (2)
  1. Footnote मूळ भाषेत मिखायाह
  2. Footnote किंवा कधीही न मिटणारा करार

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.