Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

1 शमुवेल 4

आणि शमुवेलाचा शब्द सर्व इस्राएलात पोहोचला.

कराराच्या कोशावर पलिष्टी लोकांचा ताबा

यावेळेस इस्राएली लोक पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी निघाले. इस्राएली लोकांनी एबेन-एजर येथे व पलिष्ट्यांनी अफेक येथे तळ दिला. पलिष्ट्यांनी इस्राएलशी युद्ध करण्यासाठी त्यांचे सैन्य तैनात केले आणि जसे युद्ध वाढत गेले तसा पलिष्ट्यांद्वारे इस्राएलचा पराभव झाला, त्यांच्यापैकी सुमारे चार हजार लोकांना युद्धभूमीवर मारले गेले. जेव्हा सैनिक छावणीकडे परत आले तेव्हा इस्राएलच्या वडीलजनांनी विचारले, “याहवेहने आज पलिष्ट्यांसमोर आमचा पराभव का होऊ दिला? आपण शिलोह येथून याहवेहच्या कराराचा कोश घेऊन येऊ, यासाठी की ते आपल्याबरोबर जाऊन आपल्या शत्रूच्या हातातून आपल्याला वाचवतील.”

म्हणून लोकांनी शिलोह येथे माणसे पाठविली आणि त्यांनी सर्वसमर्थ याहवेह, जे करुबांच्या मध्ये आरूढ आहेत, त्यांच्या कराराचा कोश परत आणला. आणि एलीचे दोन पुत्र होफनी आणि फिनहास हे परमेश्वराच्या कराराच्या कोशाबरोबर होते.

जेव्हा याहवेहच्या कराराचा कोश छावणीमध्ये आला, तेव्हा सर्व इस्राएली लोकांनी इतका मोठा जयघोष केला की, जमीन हादरली. तो मोठा जयघोष ऐकून पलिष्ट्यांनी विचारले “इब्री लोकांच्या छावणीमध्ये हा कसला जयघोष होत आहे?”

जेव्हा त्यांना कळले की, याहवेहचा कोश छावणीमध्ये आला आहे, तेव्हा पलिष्टी लोक घाबरून गेले. “देव छावणीत आले आहेत,” ते म्हणाले, “अरेरे! असे अद्याप कधीच घडले नव्हते. आम्हास हाय हाय! या शक्तिमान देवाच्या हातून आम्हास कोण सोडवेल? ते तेच देव आहेत ज्यांनी रानात इजिप्तच्या लोकांवर प्रत्येक प्रकारच्या पीडा आणून त्यांचा नाश केला. पलिष्टी लोकांनो, शक्तिशाली व्हा! खंबीर पुरुषांसारखे व्हा, नाहीतर जसे ते तुमचे गुलाम होत आले तसे तुम्ही इब्री लोकांचे गुलाम व्हाल. खंबीर व्हा आणि युद्ध करा!”

तेव्हा पलिष्टी लढले आणि इस्राएली लोकांचा पराभव झाला आणि प्रत्येक पुरुष आपआपल्या छावणीकडे पळून गेला. आघात खूप मोठा होता; इस्राएलने तीस हजार पायदळ गमावले. परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आणि एलीचे दोन्ही पुत्र होफनी आणि फिनहास मारले गेले.

एलीचा मृत्यू

त्याच दिवशी बिन्यामीन वंशातील एक मनुष्य, फाटलेले कपडे आणि डोक्यावर धूळ घातलेला असा युद्धभूमीतून निघून पळत शिलोह येथे गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा एली रस्त्याच्या कडेला त्याच्या आसनावर बसून पाहत होता, कारण परमेश्वराच्या कोशासाठी त्याचे हृदय कापत होते. जेव्हा तो मनुष्य नगरात आला आणि जे घडले ते सांगितले तेव्हा संपूर्ण नगरात मोठ्याने आकांत सुरू झाला.

एलीने हे रडणे ऐकून विचारले, “हा मोठ्याने रडण्याचा आवाज कशाचा आहे?”

तो मनुष्य घाईने एलीकडे गेला, एली अठ्याण्णव वर्षाचा होता आणि त्याची दृष्टी मंद असल्याने त्याला दिसत नव्हते. त्याने एलीला सांगितले, “मी आताच युद्धभूमीवरून आलो आहे; मी आजच तिथून पळून आलो आहे.”

एलीने विचारले, “माझ्या मुला, काय घडले आहे?”

ज्या मनुष्याने बातमी आणली होती त्याने उत्तर दिले, “इस्राएलने पलिष्ट्यांपुढून पळ काढला आणि सैन्याचा मोठा वध झाला. तुझे दोघे पुत्र होफनी आणि फिनहास सुद्धा मारले गेले आहेत आणि परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

जेव्हा त्याने परमेश्वराच्या कोशाचा उल्लेख केला, एली वेशीजवळच्या आसनावरून मागे खाली पडला. त्याची मान मोडली आणि तो मरण पावला, कारण तो वृद्ध आणि जड अंगाचा मनुष्य होता. त्याने चाळीस वर्षे इस्राएली लोकांचे पुढारीत्व केले1 होते.

त्याची सून फिनहासाची पत्नी, तेव्हा गरोदर असून तिचा प्रसूतिकाळ जवळ आला होता. जेव्हा तिने ऐकले की, परमेश्वराचा कोश हस्तगत केला गेला आहे आणि तिचा सासरा आणि तिचा पती मरण पावले आहेत, तेव्हा तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या व ती प्रसूत झाली, परंतु तिच्या प्रसूती वेदनांनी तिच्यावर मात केली. तिच्या मरणाच्या वेळी, तिच्या सभोवताली ज्या स्त्रिया होत्या, त्या म्हणाल्या, “भिऊ नकोस; तू एका मुलाला जन्म दिलेला आहेस.” परंतु तिने काही उत्तर दिले नाही किंवा लक्षही दिले नाही.

त्या मुलाचे नाव ईखाबोद2 असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्‍याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. ती म्हणाली, “इस्राएलमधून वैभव निघून गेले आहे, परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे.”

Source notes (2)
  1. Footnote म्हणजे न्याय
  2. Footnote ईखाबोद अर्थात् वैभव नाहीसे झाले

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.