Skip to content
BibleKenya

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण

1 योहान 3

पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू. ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत.

जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कोणतेही पाप नाही. जे कोणी त्यांच्यामध्ये राहतात ते पाप करीत राहत नाही. जे कोणी पाप करीत राहतात, त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्यांना ओळखले नाही.

अहो प्रिय मुलांनो, तुम्हाला कोणी बहकवू नये. जसे ख्रिस्त नीतिमान आहेत, तसेच जे कोणी योग्य ते करतात ते नीतिमान आहेत. जो कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले. ज्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे, ते पाप करीत राहत नाही, कारण त्यांच्याठायी परमेश्वराचे बीज राहते; म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण त्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे. यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाहीत, ती परमेश्वराची लेकरे नाहीत किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत.

प्रीती आणि द्वेष

कारण आपण एकमेकांवर प्रीती करावी हाच संदेश तुम्ही सुरुवातीपासून ऐकला आहे. आपण काईनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याने त्याचा वध का केला? कारण काईनाची कृत्ये वाईट होत्या आणि त्याच्या भावाची कृत्ये नीतियुक्त होती. म्हणून प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो जगाने तुमचा द्वेष केला, तर आश्चर्य करू नका. आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात. जे कोणी भावाचा आणि बहिणीचा द्वेष करतात ते खुनी आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही खुनी व्यक्तीमध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही.

प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे. जर कोणाजवळ ऐहिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तीमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल? प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.

यावरून आपल्याला माहीत होते की, आपण सत्याच्या पक्षाचे आहोत आणि त्याच्या समक्षतेत आपली हृदये विसावतात. जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत असतील तर हे लक्षात ठेवा की, परमेश्वर आपल्या अंतःकरणापेक्षा महान आहेत आणि ते सर्वकाही जाणतात. प्रिय मित्रांनो, जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत नसतील तर परमेश्वरासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे आणि आपण जे काही मागतो ते त्यांच्याकडून मिळते, कारण आपण त्यांच्या आज्ञा पाळतो आणि त्याला आवडणार्‍या गोष्टी करतो. ही त्यांची आज्ञा आहेः त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी. जे कोणी परमेश्वराच्या आज्ञा पाळतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. आणि अशा रीतीने आपल्याला समजते की परमेश्वर आपल्यामध्ये राहतात: परमेश्वराने जो आत्मा आपणास दिला आहे त्याद्वारे हे आपणास समजून येते.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.

Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.

BibleKenya

Reader settings

Theme
Font
Alignment
Reading width

Saved in this browser and used offline too. Press ? for keyboard shortcuts.