Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
1 इतिहास 20
दावीद राब्बा हस्तगत करतो
त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला. दावीद तिथे पोहोचला, तेव्हा त्याने राब्बाहचा राजा मिलकोम1 च्या डोक्यावरील मुकुट काढला—तो मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सोन्याचा एक तालांत2 होते व त्यावर मोलवान रत्ने जडविलेली होती; तो दावीदाच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्याने त्या शहरातून मोठ्या प्रमाणात लूट घेतली. आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.
दावीदाचे पलिष्ट्यांबरोबर युद्ध
कालांतराने, पलिष्ट्यांबरोबर गेजेर येथे युद्ध झाले, सिब्बखय नावाच्या हुशाथी मनुष्याने रेफाईमच्या वंशातील सिप्पय नावाच्या एका मनुष्याला ठार मारले, तेव्हा पलिष्टी शरण आले.
पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धात याईराचा पुत्र एलहानानने लहमी या गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले, ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती.
आणखी गथ येथे झालेल्या दुसर्या एका युद्धात प्रत्येक हाताला सहा बोटे आणि पायाला सहा बोटे; असे एकंदर चोवीस बोटे असलेला एक धिप्पाड मनुष्य होता. तो सुद्धा राफाहच्या वंशातील होता. जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली, तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआचा पुत्र योनाथानने त्याला ठार केले.
हे गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीद व त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले.
Source notes (2)
- Footnote किंवा मोलेख
- Footnote अंदाजे 34 कि.ग्रॅ.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.