Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण
1 इतिहास 18
दावीदाची यशोगाथा
काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.
दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.
याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने1 सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला. दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.
जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले. नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ2 व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.
हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ3 यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.
दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.
जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले. त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
दावीदाचे अधिकारी
दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.
जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता;
आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा.
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख4 याजक;
शावेशा राजाचा चिटणीस होता.
यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता.
दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.
Source notes (4)
- Footnote किंवा आपली सत्ता स्थापित करावयास
- Footnote किंवा तेबाह
- Footnote इतर मूळ प्रतींनुसार तोई
- Footnote इतर मूळ प्रतींनुसार अबीमेलेख
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण. Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Licensed under CC BY-SA 4.0. ” Notice of copyright must appear on the title or copyright page of the work as follows: Copyright and trademark statements copied from above Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Source: eBible.org. Typeset from the source files; no intended changes to scripture wording. BibleKenya is not endorsed by the rights holder.
Full source notice & licence · CC BY-SA 4.0 · SourceEdition imported 2026-10-25.